केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे अभिनव आंदोलन

बेळगाव : प्रतिनिधी
केंद्र सरकारने दरवाढीची कमान सातत्याने चढती ठेवली आहे. त्यामुळे जनसामान्यांचे जगणे मुष्कील झाले आहे या परिस्थितीत नागरिकांसमोर संकटाचा डोंगर उभा ठाकला आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेसतर्फे अभिनव आंदोलन छेडण्यात आले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचा निषेध म्हणून काँग्रेस नेत्यांनी सायकली चालवून सरकारचा निषेध केला. या आंदोलनात लोकप्रतिनिधींनी भाग घेवून शहरातील रस्त्यावरून सायकल चालविली. त्यामुळे हे आंदोलन लक्षवेधी ठरले. आंदोलनापूर्वी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे आ. सतीश जारकीहोळी आणि आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. केंद्राच्या मनमानी धोरणामुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची सातत्याने दरवाढ होत आहे. या महागाईवर नियंत्रण आणण्यात सरकारला अपयश आले आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच सायकल चालवून नागरिकांना आता पेट्रोल परवडत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या आंदोलनात काँग्रेसचे आ. अंजली निंबाळकर, पदाधिकारी राजू सेठ, विनय नावलगट्टी आणि इतर सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *