बेळगाव : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून कोलमडलेले नागरिकांचे दैनंदिन व्यवहार आता पूर्वपदावर आले आहेत. सोमवार सकाळपासून शहरातील रस्ते पुन्हा नागरिकांच्या संचारामुळे फुलून गेल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांची रोजच्या व्यवहारातील लगबग सोमवारी सर्वत्र दिसून आली. आपापल्या कामकाजाची गाडी रुळावर आणण्याच्या दृष्टीने नागरिकांचा उत्साह दिसून येत होता.
एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून लॉकडाउनची कार्यवाही सुरू झाली. त्यानंतर यामध्ये जून अखेरपर्यंत सातत्याने वाढ होत राहिली. त्यामुळे नागरिकांसमोर समस्या उभ्या ठाकल्या होत्या. दैनंदिन व्यवहार बंद राहिल्यामुळे व्यापारी वर्गाचे देखील मोठे नुकसान झाले होते. आता राज्यसरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यामुळे व्यवहारांना मुभा मिळाली आहे. लॉकडाउनच्या काळात उपलब्ध वेळेत खरेदी करून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळत होती. त्यानंतर मात्र, दिवसभर व्यवहार पूर्णपणे बंद राहिले होते. आता अनलॉक प्रक्रियेमध्ये नागरिकांना रात्री 9 पर्यंत संचाराची मुभा मिळाली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील प्रलंबित कामे करून घेण्यासाठी नागरिकांची धडपड दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील रहदारीचा संचार देखील पूर्वपदावर आल्याचे दिसून आले.
अनलॉक सुरू… दैनंदिन जीवन पूर्वपदावर
