बेळगाव
योगाभ्यास ही भारताने जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे .त्यामुळे आज जगभरात योगसाधनेचा पुरस्कार सुरू आहे. अनेक विकारांवर मात करण्याबरोबरच एक जीवन पद्धती म्हणून याचा स्वीकार करणे योग्य ठरेल असे विचार आयुर्वेद आणि योग्य शाळेचे संचालक डॉ. रुपेश साळुंखे यांनी स्मार्ट न्यूज प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. जागतिक योग दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी याबाबत माहिती दिली. तसेच योगाभ्यासाचे महत्त्व कथन केले.
चायनीज,जापनीज,आफ्रिकन.. अशा विविध औषधांच्या कित्येक पद्धती आज जगभरात अस्तित्वात आहेत. पण व्याधी बरा होण्यासाठी एव्हाना एखादा आजार होऊच नये म्हणून कार्य करत असणारी अतिशय सोपी,सुरक्षित,विनाखर्च व नैसर्गिकरित्या अबलांपासून वृद्धांपर्यंत प्रभाव दाखविणारी चिकित्सा म्हणजे ‘योग-चिकित्सा पद्धती’.. भारताच्या संस्कृतीमधील ही अस्मिता जगभराच्या देशांनी स्वीकारली आहे. योग-अभ्यास मांसपेशींची लवचिकता टिकवितो. मांस तथा स्नायूंमध्ये बल उत्पन्न करतो. तुमच्या व्यक्तीमत्वामधील बांधेसूद शरीर देण्याचा प्रयत्न करतो. अस्थि-संधि-स्नायू यांच्या ठिकाणी असलेली जोडणी किंवा एकत्रित बांधून ठेवण्याची क्षमता नक्कीच योगामुळे वाढते. मणक्यांचे विकार होऊच देत नाही. कारण मणक्यांची झीज थांबवतो. मणक्यांशी संबंधित मांसपेशी तथा स्नायूंची लवचिकता वाढवितो. विशिष्ट आसनांमुळे हाडांचाही रक्तपुरवठा वाढतो. सार्वदहीक रक्तधातूंचे चलनवलन सुधारते.शरीरातील रसवाही ग्रंथी अर्थात लिंफ ग्लॅंड मधील स्त्राव सुधारून व्याधीप्रतिकारक शक्ती वाढते. हृदयाची गती सुधारण्यासोबत मानसिक दडपण तथा नैराश्य कमी होण्यासाठी मदत होते. फक्त श्वसनाचा अभ्यास अर्थात प्राणायाम तथा ततसंबंधीत विविध प्रकार खात्रीपूर्वक उच्च रक्तदाब कमी करू शकतो. अॅड्रीनल ग्लॅंड पासून मिळणारे कॉर्टीसोलचे स्त्राव योग अभ्यासातून नियंत्रीत केले जातात.परिणामी व्याधीप्रतिरोधकशक्ती वाढविण्यापासून रकतदाब,मधुमेह तथा रक्तातील अतिरिक्त चरबी नियंत्रीत करण्यापर्यंत याचा फायदा होतो. औदासिन्य या मानस व्याधीमध्ये कमी झालेले सिरोटीनीन,पद्मासन तथा सिद्धासनामुळे वाढू लागते. तथा प्रसन्न व आनंदी व्यक्तिमत्व दिसू लागते. अशी माहिती त्यांनी दिली.