नवी दिल्ली : वृत्तसंस्था
स्वच्छ भारत अभियान- शहर त्याचबरोबर अटल कायापालट आणि नागरी परिवर्तन मोहिमेचा दुसरा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कार्यान्वित केला. या दोन योजनांमुळे शहरे कचरामुक्त होतील आणि त्यांची पाण्याची समस्याही मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वच्छ भारत अभियान (एसबीएम- यू २.०) आणि अमृत २.० योजनांमुळे सांडपाणी प्रक्रिया न करता कोणत्याही नदीमध्ये सोडण्यात येणार नाही याची हमी मिळेल, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे पंतप्रधान मोदी यांनी या दोन योजना कार्यान्वित केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्नपूर्ती करण्याच्या दृष्टीनेही या योजना महत्त्वाच्या असल्याचे ते म्हणाले.
या दोन योजना भारताचे वाढते शहरीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट २०३० साध्य करण्यासाठी फायद्याच्या आहेत. ही योजना सर्व शहरे कचरामुक्त करून पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त आहे. काळे किंवा करडय़ा रंगाचे सांडपाणी शुद्ध करण्याचा उद्देश अमृत योजनेत ठेवण्यात आला आहे.