छाननी नंतर आता अर्ज माघारीचे वेध

बेळगाव : प्रतिनिधी
महानगर पालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सोमवारी मोठ्या चुरशीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अखेरच्या दिवशी अनेक जणांनी उत्साही वातावरणात अर्ज दाखल करून नगरसेवक होण्याची इच्छा प्रकट केली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.आता अर्ज माघारीचे वेध लागले आहेत.

नगरसेवक होण्यासाठी इच्छुक उमेवारांच्या मोठ्या गर्दीमुळे आता यातील चुरस अधिकच वाढली आहे. या खेपेस आपणाला नगरसेवक पदाची संधी मिळावी यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे.

अर्ज भरणा करण्याच्या अखेरच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल होण्याचे चिन्ह स्पष्ट होते. त्याअनुसार एकाच दिवशी 434 अर्ज दाखल झाले. यापूर्वी दाखल झालेले 85 अर्ज मिळून आता एकूण 519 अर्ज दाखल झाले आहेत. म. ए. समितीच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय पक्ष असणार्‍या भाजप आणि काँग्रेस यांनी याखेपेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणुका लढविण्याचा निर्धार केला आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत. छाननी प्रक्रियेनंतर उमेदवारांच्या माघारीचा टप्पा पूर्ण होणार आहे. त्यामुळे उपलब्ध वेळात दबाव तंत्राचा वापर करून माघारीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे अंतिम चित्र त्यानंतर स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *