बेनन स्मिथच्या माजी विद्यार्थ्यांनी केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार

बेळगाव : प्रतिनिधी

बेननस्मिथ हायस्कूलच्या १९८६ बॅचच्या विद्यार्थ्यांनी पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोरोना काळात महत्वाची कामगिरी बजावलेल्या कोव्हिड योद्ध्यांचा यथोचित सन्मान केला.

गेल्या दोन वर्षांपासून या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

लॉकडाऊन काळातसुद्धा या विद्यार्थ्यांनी गरजवंताना मदत केली असून मराठा मंदिर येथील आयसोलेशन सेंटरला सुध्दा मदत केली होती.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन सेंटरमध्ये रुग्णांची सेवा केल्याबद्दल मदन बामणे,अंकुश केसरकर, कोव्हिडमुळे मृत पावलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे शंकर पाटील,गोसेवा करणारे नारू निलजकर, शववाहिनी चालक निस्सार समशेर यांचा कोव्हिड योद्धे म्हणून स्मृतिचिन्ह, शाल,पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुरकुटे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देतांना मदन बामणे यांनी कोव्हिड काळात आलेले अनुभव कथन केले आणि जनतेच्या सहकार्यानेच आयसोलेशन सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करू शकलो असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल मुरकुटे यांनी केले.
यावेळी अमर कारेकर, दिगंबर प्रभू, संजय देसाई, विश्वनाथ बड्डे ,शुभम मोरे, महादेव केसरकर,रोहित मुरकुटे आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन राजू लोंढे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *