कोरोना नियमांच्या चौकटीतच गणेशोत्सव साजरा करा,

बेळगाव : प्रतिनिधी

शहापूर मंडल पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांचे आवाहन

कोरोना संक्रमणाची खबरदारी घेत शासनाने यावर्षीच्या सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव संदर्भात मार्गदर्शक सूची जारी केली आहे.शासन आणि प्रशासनाने जनतेच्या आरोग्याची आणि जीवाची काळजी घेत कोरोना नियमावली तयार केली आहे. कोरोना नियमांच्या चौकटीतच सर्वांनी गणेशोत्सव भक्तिभावात आणि शांततेत साजरा करावा असे आवाहन शहापूर पोलीस ठाण्याचे मंडल पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांनी केले आहे.
आज सोमवारी सायंकाळी वडगाव येथील जिव्हेश्वर मंगल कार्यालयात शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील 82 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शहापूर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी, मंडळांच्या समस्या व मागण्या मांडल्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नियमांच्या चौकटीतच गणेशोत्सव साजरा करेल अशी ग्वाही देतानाच, नेताजी जाधव यांनी ज्या परिसरात म्हणून मंदिरे नाहीत त्या मंडळांना निर्धारित आकाराचा मंडप घालण्याची परवानगी प्रशासनाने लवकरात लवकर द्यावी अशी मागणीही केली. अशोक चिंडक,रमेश सोनटक्की,राजू बिर्जे, नितीन जाधव, राजू उंडाळे व अन्य सदस्यांनीही मंडळांच्या समस्या आणि मागण्या मांडल्या.
यावेळी बोलताना विनायक बडीगेरर म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात प्रशासनाने मार्गसूची जारी केली आहे.गणेशोत्सवा दरम्यान देखावे, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमां ऐवजी कोरोना आणि साथीच्या रोगां संदर्भात जनजागृती करावी. डॉल्बी ला परवानगी नसून मंदिरातून भक्तीगीते छोट्या आवाजात लावण्यात यावीत.श्रीमुर्ती आगमन अथवा विसर्जना प्रसंगी मिरवणुका काढल्या जाऊ नयेत. श्रीमुर्ती घराजवळ तर प्रशासनाने ठरवून दिलेल्या तलावाच्या ठिकाणी आणि मार्गानेच सार्वजनिक श्री मूर्तींचे विसर्जन केले जावे. श्रीमूर्तींचे विसर्जन लवकरात लवकर वेळेत करून घेतले जावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपली आणि आपल्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, गणेशोत्सव भक्तिभावात आणि शांततेत साजरा करावा असे कळकळीचे आवाहनही बडीगेर यांनी यावेळी केले. शहापूर,वडगाव, खासबाग, जुने बेळगाव,भारत नगर या परिसरातील बहुसंख्य मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *