जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा

बेळगाव प्रतिनिधी

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्ताच्या कोरोना महामारी च्या काळापर्यंत देशासमोर आलेल्या आपत्कालीन प्रसंगी पत्रकारांनी अत्यंत निर्भीडपणे कार्य केले आहे, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी बोलताना केले. आज मंगळवारी सायंकाळी बेळगावातील आय. एम. ए.सभागृहात जिल्हा मराठी पत्रकार संघाचा 44 वा वर्धापन दिन आणि जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा शहापूरकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता निर्भीडपणे कार्य केलेल्या बेळगावातील पत्रकार आणि छायाचित्रकारांचा डॉ. अनिल पोटे, आय एम ए चे कार्यवाह डॉक्टर देवेगौडा, माजी महापौर नागेश सातेरी, सदानंद कामत,सुहास हुद्धार, डॉ. रवींद्र अनगोळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र,रोप,सैनिटायझर मास्क व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पुढे बोलताना कृष्णा शहापूरकर यांनी कोरोनाने सर्वच क्षेत्राला धक्का दिला आहे.याला माध्यम क्षेत्रही अपवाद ठरलेले नाही.कोरोना काळात जाहिरातींचा ओघ कमी झाला आहे, वृत्तपत्र मालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.असंख्य पत्रकारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अशा प्रतिकूल काळातही पत्रकार आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना श्रीकांत काकतीकर यांनी कोरोना महामारीच्या काळात माध्यमे आणि पत्रकारांसमोर आलेल्या अडचणींची माहिती दिली. सेवाभावी कार्य करणाऱ्या संस्थांच्या पाठीमागे पत्रकार नेहमी ठामपणे उभे राहतात असेही स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरोना काळात मरण पावलेल्या पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ऑलिंपिक स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा पोटे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.डॉक्टर राजश्री अनगोळ यांनी जिव्हाळा संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत चौगुले, गीतांजली रेडेकर,संजीवनी पाटील यांनी केले.मरियम टेबला यांनी ईशस्तवन सादर करताना शेवटी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *